जळगाव – सध्या कोरोनाची वाढती स्थिती पाहता सर्वसाधारण सभा, मेळावे, मुलाखती व अन्य अनुषंगिक कामांसाठी ५० लोकांच्या मर्यादेत परवानगी देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी आता परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. या कार्यक्रमाच्या ठिकाणी पारंपरिक वाद्यवृंदाचा वापर करीत असताना ध्वनी प्रदूषण नियममधील नमूद बाबींचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. खुले लॉन्स, विना वातानुकुलीत मंगल कार्यालयांमध्ये ५० लोकांच्या मर्यादेत लग्न समारंभ आयोजनासाठी परवानगीची अट कायम ठेवली. तर उपस्थितांच्या आधारकार्ड सक्तीची अट जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी काढलेल्या आदेशातून वगळली आहे.
तसेच लग्न समारंभ आयोजकांना आधारकार्डची सक्ती करू नये. आवश्यकता भासल्यास उपस्थितांची यादी प्रशासनास सादर करण्याची जबाबदारी आयोजकांवर राहील. लग्नात कोणत्याही प्रकारे मिरवणूक काढता येणार नाही. फटाक्यांचा वापर कमीत कमी करण्याचे आवाहन केले आहे.
चेहऱ्यावर मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे. यापार्श्वभूमीवर वर नमूद कार्यक्रम आयोजित करण्याकरीता पुढील सूचना सर्व संबंधितांना निर्गमित करण्यात येत आहेत. त्यात खुले लॉन्स, विना वातानुकूलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह अशा ठिकाणी व्याख्याने, मेळावे, मुलाखती, संस्थांच्या सर्वसाधारण सभा व अन्य अनुषंगिक कार्यक्रमांचे आयोजन केवळ ५० लोकांच्या मर्यादेत करता येईल.