जळगाव – ‘उपमहापौर आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत गुरुवारी उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग ८ मध्ये भेट दिली. शहराचा वाढीव भाग असल्याने या परिसरात रस्ते, गटारी आणि पुरेसे पथदिवे नसल्याचे नागरिकांनी सांगितले. उपमहापौर सुनील खडके यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत ज्या समस्या तात्काळ सोडवता येतील त्या सोडवाव्या अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग ८ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील, प्रतिभा पाटील, ऍड.शुचिता हाडा, मिनाक्षी पाटील, अमित काळे, भारत कोळी, सुधीर पाटील, मनोज काळे आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.
कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावावी
आव्हाणे शिवारातील कचरा फॅक्टरी रस्त्यावर असलेल्या पवार पार्कच्या रहिवाशांनी कचरा डम्पिंग ग्राउंड ऐवजी रस्त्यावर टाकला जातो अशी तक्रार केली असता उपमहापौर सुनील खडके यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या. तसेच पवार पार्कमध्ये सफाई कर्मचारी साफसफाई करीत नसल्याने संबंधित कर्मचाऱ्याला सूचना देत साफसफाई योग्यप्रकारे होत असल्याबाबत नागरिकांच्या सह्या घेऊन तसे सादर करण्याचे उपमहापौरांनी सांगितले. परिसरात रस्ते नसल्याने रस्त्यांसाठी डब्ल्यूबीएमचा प्रस्ताव तयार करावा असेही त्यांनी सुचविले. पाण्याची गंभीर समस्या नागरिकांनी मांडल्याने शहर अभियंता यांनी मार्च अखेरपर्यंत परिसराला नियमित पाणी पुरवठा होईल अशी माहिती दिली.
पथदिवे तात्काळ दुरुस्त करा
प्रभाग ८ मध्ये अनेक ठिकाणी पथदिवेच नाही तर काही पथदिवे अनेक दिवसापासून बंदवस्थेत असल्याची तक्रार नागरिकांनी मांडली. उपमहापौर सुनील खडके यांनी लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत पथदिवे दुरुस्त करण्याचे सांगितले.
सांडपाण्याच्या डबक्यातील पाणी निचरा होणार
आहुजा नगरातील वृंदावन सोसायटीजवळ असलेल्या एका मोकळ्या भूखंडात परिसरात सांडपाणी जमा होऊन मोठे डबके तयार झाले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने त्याठिकाणी दलदल तयार होऊन डास, मच्छर आणि सापांचा नागरिकांना सामना करावा लागतो. नागरिकांनी याबाबत उपमहापौरांना माहिती दिली असता उपमहापौर सुनील खडके यांनी शहर अभियंता अरविंद भोसले यांच्याशी चर्चा करून उद्याच जेसीबीच्या साहाय्याने पाणी निचरा करण्यासाठी चारी खोदण्याचे सांगितले. तसेच मनुदेवी नगरातील मनपाच्या मोकळ्या जागेवर भर टाकून सपाटीकरण करण्याच्या सूचना देखील उपमहापौरांनी दिल्या.
पहिल्यांदा लोकप्रतिनिधीने दिली भेट
गेल्या २० वर्षापासून आम्ही या परिसरात राहतो. आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधीने आमच्याकडे ढुंकून देखील पाहिले नव्हते. आज पहिल्यांदा उपमहापौर म्हणून सुनील खडके यांनी भेट दिली. आमच्या परिसरातील कामे होतील तेव्हा होतील परंतु उपमहापौरांनी आमची विचारपूस केली आणि समस्या जाणून घेतल्या याचा आम्हाला आनंद आहे.
मनोज सोनवणे, रहिवासी, चंदूअण्णा नगर