जळगाव – कोरोनासारख्या गंभीर साथीच्या आजारामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात फक्त कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत होते, मात्र आता लवकरच नॉन-कोविड रूग्णांवर उपचार होणार असून याबाबत प्रशासनाने तयारी सुरू केली असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली आहे.
कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर सिव्हील हॉस्पीटलला डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये परिवर्तीत करण्यात आले आहे. मात्र, सुमारे दोन महिन्यांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा नॉन-कोविड सुविधा सुरू करण्याचे नियोजन सुरू होते.
या अनुषंगाने ही सुविधा येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी सुरू होऊ शकणार आहे. नॉन कोविड सुविधा सुरू झाल्यावर गर्दी होऊन पुन्हा संसर्ग वाढू नये, यासाठी सुरक्षा समिती गठीत करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे सिव्हिलमध्ये कोविड व नॉन -कोविड सुविधेची विभागणी करण्यात येणार असून येत्या दोन दिवसांत या दोन्ही वॉर्डाचे दुसर्यांदा निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.
तसेच जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने एप्रिल महिन्यापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. तेव्हापासून नॉन कोविड रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे ही सुविधा पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सर्व शक्यता पडताळून पाहण्यात येत होत्या.
अखेर बुधवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कोरोना नोडल ऑफिसर तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बी.टी. जमादार आदींची चर्चा होऊन या आठवड्यात सिव्हिलमध्ये नॉन कोविड सुविधा सुरू करण्याबाबत एकमत झाले. गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा कोविड रुग्णालयातील बाधित रुग्णांची संख्या शंभराच्या आत आहे. बुधवारी ती अवघी ७६ होती. त्यामुळे यापूर्वीच काही वॉर्डाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्यांचे येत्या दोन दिवसांत पुन्हा निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.