जळगाव (प्रतिनिधी) : येथील रहिवासी पार्थ चंद्रकांत यादव हा पहिल्याच प्रयत्नात प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी नेट परीक्षा उत्तीर्ण झाला असून त्याची ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी देखील निवड झाली आहे. त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पार्थ यादव हा हैदराबाद येथील इंग्लिश आणि फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी येथे इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याने शिकत असतानाच परीक्षा दिली. मंगळवारी एक डिसेंबर रोजी सकाळी नेट परीक्षेचा निकाल लागला. त्यात तो परीक्षा उत्तीर्ण झाला.
सोबत त्याची जूनियर रिसर्च फेलोशिपसाठी देखील निवड झाली आहे. पार्थ यादवची आई राजश्री यादव ह्या एसएसबीटी संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात लॅब असिस्टंट असून त्याचे वडील चंद्रकांत यादव हे कोल्हापूर येथे पत्रकारिता करतात. तसेच त्याला मू.जे.महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका सविता नंदनवार यांचे मार्गदर्शन लाभले.
पार्थ यादव हा जिंदगी फाउंडेशन, जळगावच्या माध्यमातून सामाजिक सेवेमध्ये देखील कार्यरत असून त्याचे जिंदगी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुष्मिता भालेराव, अजय पाटील निशिगंधा भालेराव यांच्यासह शहरातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.