मुंबई – जगभरात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे गुंतवणूदारांचा कल होता. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात सोनेखरेदीत वाढ झाली आणि सोन्याचे दर झपाट्याने वाढले. मात्र, आता कोरोना लसीबाबतचे सकारात्मक वृत्त येत असल्याने सोन्याची झळाळी ओसरत आहे. सोमवारी देशातील शेअर बाजार बंद असले तरी जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत घट झाली असून सोने चार वर्षांतील मासिक नीचांकी स्तरावर पोहचले आहे.
जगभरात कोरोना लस विकसीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक कंपन्यांची लस तयार असून चाचणीचा अंतिम टप्पा सुरू आहे. त्यामुळे लवकरच कोरोना लस बाजारात येण्याची शक्यता आहे. कोरोना लसीच्या वृत्ताने बाजारात सकारात्मकता निर्माण झाली असून सोन्याच्या किंमतीत घट होत आहे. सोमवारी जागतिक बाजारात स्पॉट गोल्डच्या किंमतीत 1.2 टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचे दर 17.66.26 डॉलर प्रति औंसवर आले होते. नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 6 टक्क्यांनी घट झाली आहे. नोव्हेंबर 2016 नंतरची ही सर्वाधिक मासिक घट आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची झळाळी ओसरण्यासह चांदीच्या किंमतीतही मोठी घट झाली आहे. सोमवारी चांदीच्या किंमती 3.2 टक्क्यांनी घसरल्या होत्या. त्यामुळे चांदीचे दर 21.96 डॉलर प्रतिऔंसपर्यंत खाली आले होते. सोन्याच्या दरात नोव्हेंबर महिन्यात मोठी घट झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात सोन्याच्या गुतंवणुकीकडे ओढा वाढला होता. मात्र, आता लस येण्याची शक्यता निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री होत आहे.
सोन्याने ऑगस्ट महिन्यात उच्चांकी दर गाठला होता. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति 10 गॅम होते. तर सोमवारी सराफा बाजारात सोन्याचे दर 24 कॅरेटसाठी 51 हजार तर 22 कॅरेटसाठी 46,350 रुपये प्रति 10 गॅम होते. यावरून उच्चांकी दरावरून सोन्याच्या किंमतीत सुमारे 8 हजारांची घसरण झाली आहे. ही सर्वाधिक घसरण आहे.
चांदीचे दर 10 ऑगस्टला 78,256 रुपये प्रति किलो होते. तर सोमवारी 59,100 रुपये प्रति किलो होते. त्यामुळे चांदीच्या किंमतीत 19 हजारांची घट झाली आहे. जागतिक बाजारात असलेले सकारात्मक वातावरण आणि अमेरिका-चीनमधील कमी झालेला संघर्ष यामुळे आता गुंतवणूकदार परत बाजाराकडे वळथ आहेत. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. तसेच डॉलरही दोन वर्षांच्या निचांकी स्तरावर असल्याने त्याचा परिणामही सोन्याच्या दरावर होत आहे.
अजून वाचा
यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा उशिरा – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड