पाचोरा, प्रतिनिधी । रेल्वेच्या पर्मनंट रेल इन्चार्ज विभागातर्फे वावडदा ते म्हसावद मेन रुळाच्या कामानिमित्त गेट बंद राहणार आहे. दि. १ व २ डिसेंबर रोजी तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने बंद राहणार असल्याचे वरिष्ठ अनुभाग अभियंता एस.सी. साळुंके यांनी सांगितले.
दि. १ व दि. २ डिसेंबर रोजी वावडदा ते म्हसावद या मेन रोड वरील गेट क्र.-१४४ हे रेल्वेच्या मशीन ब्लॉक कामासाठी तीन तासाकरीता बंद राहणार आहे. याकामाकरिता कंट्रोल ऑफिस भुसावळ येथील वेळ निर्धारित करण्यात येणार आहे. पर्मनंट रेल इन्चार्ज विभागाने सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंतच्या वेळेची मागणी भुसावळ कंट्रोल ऑफिसमध्ये केली आहे. आज देखील ब्लॉकची मागणी करण्यात आली होती.
मात्र आज ब्लॉक न मिळाल्याने उद्या मंगळवार १ किंवा परवा बुधवार २ डिसेंबर रोजी मेगा ब्लॉक घेऊन काम पूर्ण करण्यात येणार आहे. मशीन ब्लॉकमध्ये रेल्वे रूळवर काम करण्यात येते. यात रूळावर काही ठिकाणी खड्डे पडलेले असतात तर काही ठिकाणी रेल्वे रूळ खालीवर झालेला असतो तसेच गेट मधून इतर वाहनाच्या वाहतुकीसाठी फरशी बसवलेली असते त्यादेखील काढून रुळाचे काम करण्यात येणार असल्याने तीन तासांच्या ब्लॉकची मागणी करण्यात आली आहे.