तामिळनाडू – अभिनेते आणि तामिळ चित्रपटसृष्टीचे मेगास्टार रजनीकांत लवकरच नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. ही भूमिका चित्रपटातील नव्हे तर राजकारणाशी संबंधित आहे. पुढील वर्षी होणाऱ्या तामिळनाडूमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये थलैवा म्हणजेच रजनिकांत निवडणूक लढण्याची शक्यता आहे. याबाबतची घोषणा आज अभिनेता रजनीकांत करू शकतात.
तामिळनाडूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर तेथील राजकारणात निवडणुकीसंबंधी हालचाली वाढू लागल्याचे चिन्ह दिसत आहे. तसेच यावेळी अभिनेता रजनीकांत निवडणूक लढवणार का ? अशी जोरदार चर्चा रंगली आहे. आपल्या राजकीय पक्षाची भूमिका ठरवत २०२१ मध्ये होणारी तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा ते आज करु शकतात. तामिळनाडूमधील सर्व राजकीय पक्षांची नजर सध्या रजनीकांत काय घोषणा करतात याकडे लागली आहे. बैठकीनंतर रजनीकांत निवडणूक लढणार की नाही यासंबंधी अधिकृत माहिती समोर येईल.
२०२१ मध्ये तमिळनाडू विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. रजनीकांत यांनी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलं आहे की, ‘सर्वांत आधी ते रजनी मक्कल मंडरमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यानंतरच विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, यासंदर्भात निर्णय घेण्यात येतील. रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. परंतु, अधिकृतरित्या अद्याप त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. तसेच गेल्या वर्षी अभिनेता कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर हे दोघेही एकत्र येऊन राजकारणाची इनिंग खेळणार असल्याच्या चर्चांनी तामिळनाडूच्या राजकारणात तडका बसला आहे.