नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गावर मात करण्यासाठी सगळेच देश लस निर्मितीच्या कामात गुंतले आहेत. भारतातही अनेक कंपन्या या लसीच्या संशोधनात गुंतल्या आहेत. भारत बायोटेक आणि पुण्यातील सिरम इन्टिट्यूटमध्ये बनवण्यात येणाऱ्या कोरोनावरील लसीचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे लवकरच देशात कोरोनावरील लस वितरीत केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान कोरोनावरील लस आधी कोणाला दिली जाणार? याबाबतही अनेक चर्चा सुरु आहेत.
कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यावर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले खेळाडू आणि मार्गदर्शक यांना प्राधान्याने दिली जाईल, असे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. लांबणीवर पडलेली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुढील वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान जपानची राजधान टोकियो येथे भरवली जाणार आहे. भारत आतापर्यंतचे सर्वात मोठे खेळाडूंचे पथक ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पाठवणार असल्याची माहिती रिजिजू यांनी दिली. दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांची तारीख ठरलेली आहे. त्यामुळेच कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यावर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना आणि मार्गदर्शकांना ही लस प्राधान्याने दिली जाईल, यासाठी आम्ही आरोग्य मंत्रालयाशी बोलणार आहोत. लॉकडाऊनचा कालावधी संपला आहे, देशभरात आता अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दिल्ली अर्धमॅरेथॉन ही महत्त्वाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा यशस्वीपणे पार पडली आहे. त्यामुळे आता इतर क्रीडा स्पर्धांना सुरुवात करण्यास हरकत नाही.
येत्या दोन आठवड्यांत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीसंदर्भात केंद्र सरकारकडे तातडीच्या परवान्यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिली आहे. या लसीचं वितरण हे सुरुवातीला भारतातच केलं जाणार आहे. त्यानंतर कोव्हॅक्स देश म्हणजेच आफ्रिकेतील देशांमध्ये लसीचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती आदर पुनावाला यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (28 नोव्हेंबर) कोरोना लसीची निर्मिती सुरू असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. आदर पुनावाला आणि सिरममधील संशोधकांकडून त्यांनी लसीबाबतची माहिती घेतली. त्यानंतर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली होती. कोरोना लसीची तिसरी चाचणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्रीय आरोग्य विभागाकडून परवानगी घेण्यात येणार आहे. येत्या दोन आठवड्यात लायसन्सची मागणी करण्यात येणार असल्याचं आदर पुनावाला यांनी सांगितलं होतं.