जळगाव प्रतिनिधी । जळगावातील सबजेलमधून फरार झालेला आरोपी सुशील मगरे हा पहुर पोलीसांच्या जाळ्यात अडकला आहे. सबजेलमधून रक्षकाच्या कपाळाला बंदूक लावून २५ जुलै रोजी फरार झालेल्या कैदी बडतर्फ पोलीस अधिकारी सुशील मगरे याला पहूर पोलीसांनी आज सकाळी अटक करण्यात आली आहे .
फरार झालेल्या कैदी सुशील अशोक मगरे रा. पहूर, ता.जामनेर, गौरव विजय पाटील रा. शिरूड नाका, रा. तांबापूरा, अमळनेर, सागर संजय पाटील रा. पैलाड अमळनेर या कैद्यांनी सुरक्षारक्षक ऑनड्यूटी असतांना तिघांनी मारहाण केली आणि पिस्तूलाचा धाक दाखवत कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून पळ काढला होता. २५ जुलै रोजी रक्षकाच्या कपाळाला बंदूक लावून जगदीश पाटील याच्या मदतीने ते फरार झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने महिन्याभरानंतर गौरव पाटील, सागर पाटील तसेच जगदीश पाटील यांनादेखील अटक केली होती. त्याचबरोबर त्यांना पळून जाण्यात मदत करणाऱ्या इतर पाच ते सहा जणांना देखील अटक केली आहे. या प्रकरणी हे सर्व जण कारागृहात आहेत. यातील मुख्य सूत्रधार असलेला आणि बडतर्फ पोलिस कर्मचारी सुशील अशोक मगरे रा. पहूर ता.जामनेर पोलिसांना चकवा देत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विविध पथक त्याच्या मागावर होते. मुंबई, पुणे, गुजरात आदी ठिकाणी पोलिस त्याचा कसून शोध घेत होते.
रविवारी २९ नोव्हेंबर रोजी पहूर पोलिस स्टेशनला प्रथमच पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झालेले राहुल खताळ यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सुशील मगरे याच्या लेले नगर भागातील घरी पोलिसांनी पहाटे ५.३० वाजता धाड टाकली. तेथे सुशील मगरला कुणकुण लागताच तो फरार होण्यासाठी बाहेर आला. त्याने २५ फूट जिन्यावरून खाली उडी मारली आणि पलायनाच्या बेतात असताना पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर ठाकरे यांनी त्याला शिताफीने पकडले.
खिशामध्ये गावठी कट्टा सापडला असून त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला पोलिस स्टेशनला आणण्यात आले.या कारवाईची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना देण्यात आली असून त्यांनी पहूर पोलिसांचे अभिनंदन केले आहे. कारवाई पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवरे ,पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर देशमुख,अनिल राठोड, ज्ञानेश्वर ठाकरे यांनी केली असून त्यांचे कौतुक होत आहे.