जळगाव, प्रतिनिधी । आगामी १० वर्षात जळगाव जिल्हा पूर्णपणे थॅलॅसिमिया मुक्त समाज करण्याचा निर्धार केलेल्या केशवस्मृति प्रतिष्ठान ला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी थॅलेसिमिया रुग्णांसाठी बोनमॅरो क्रॉसमॅचिंगची तपासणी शिबीरच्या उद्घाटन प्रसंगी केले.
ते केशवस्मृति प्रतिष्ठान तर्फे व पेरेंट्स असोसिएशन ऑफ थॅलॅसिमिक यूनिट ट्रस्ट याच्या सहकार्याने थॅलेसिमिया रुग्णांसाठी एचएलए टेस्ट कॅम्प अर्थात बोनमॅरो क्रॉसमॅचिंगची तपासणी शिबिराचे औपचारिक उद्घाटन प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एच. चव्हाण, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, मुंबई येथील कोकिलबेन अंबानी हॉस्पिटलचे प्रसिद्ध ओंकोलोजिस्ट व बोनमॅरो ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. शंतनू सेन व समुपदेशक ज्योती टंडन, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी अविनाश राउत यांनी पुढे सांगितले की, ज्या मुलांना थॅलेसिमियाची लागण झालेली आहे परंतु पालकांना माहित नाही अशा पालकांना व त्या मुलांना सहकार्य करून त्यांचे जीवन वाचवू शकतो. त्यांना सुदृढ जीवन जगण्यासाठी मदत करू शकतो. आपण सर्वांनी थॅलेसिमिया दूत म्हणून काम करत थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांना शोधण्यात मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आगामी १० वर्षात जळगाव जिल्हा पूर्णपणे थॅलॅसिमिया मुक्त समाज करण्याचा निर्धार केलेल्या केशवस्मृति प्रतिष्ठानला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एच. चव्हाण, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी मार्गदर्शन केले.
पुस्तक प्रकाशन – थॅलेसिमिया मुक्त समाज प्रकल्प प्रमुख डॉ सई नेमाडे लिखित थॅलेसिमिया प्रबंधन और नियंत्रण या पुस्तकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी ही एचएलए टेस्ट करणे अनिवार्य असते. सदर टेस्ट खर्चिक असल्यामुळे सर्व सामान्यांना पेलणे शक्य नसते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात प्रथमच एचएलए टेस्ट कॅम्प शिबिराचे होत असल्याची माहिती या उपक्रमाच्या प्रकल्प प्रमुख डॉ. सई नेमाडे यांनी दिली.