जळगाव (प्रतिनिधी) : लहान मुलांमधील वाढती व्यसनाधीनता कशी वाढत जात आहे व त्याचे स्वरूप याविषयी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी माहिती दिली. त्यावर, अल्पवयीन मुलांमधील व्यसनाधीनता थांबविण्यासाठी उपाययोजना केली जाईल अशी माहिती ठाकूर यांनी दिली.
याविषयी एक निवेदन देखील मंत्री ठाकूर यांना देण्यात आले. नितीन विसपुते यांनी सांगितले की, अल्पवयीन मुले फेविकॉल, व्हाईटनर, झेंडू बाम आदी घटक वस्तूंचा नशा करण्याचे प्रमाण मोठे आहे. जळगावात या गंभीर विषयी चेतना व्यसनमुक्ती केंद्र काम करीत असून लहान मुले भविष्यात मोठ्या नशेकडे वळतात अशीही भीती निर्माण झाली आहे. व्यसन कुठलेही असो ते वाईटच, त्यामुळे कोवळी मुले नशेच्या जाळ्यात येऊ नये म्हणून प्रभावी उपाययोजना आखाव्यात, जळगावातून चेतना व्यसनमुक्ती शासनाला मदत करायला तयार आहे, असे सांगितले.
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी, याबाबतची भीषणता ऐकल्यावर चिंता व्यक्त केली. अल्पवयीन मुलांमधील व्यसनाधीनता थांबविण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जातील अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी वैजयंती तळेले, अँड. प्रदीप पाटील, डॉ. शैलजा चव्हाण, प्रतिक सोनार, प्रा. संजय पाटील, साजिद खान, दीपक पाटील आदी उपस्थित होते.