जळगाव (प्रतिनिधी) : कोरोनाचे नियम पाळून महिलांच्या समस्यांविषयी निवेदन देण्यास आलेल्या भाजपाच्या महिला आघाडीचे निवेदन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी शुक्रवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी स्वीकारले नाही. म्हणून जिल्हा परिषदेच्या गेटवर ॲड. ठाकूर यांना काळे झेंडे दाखवून भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर सोनवणे यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. या महिला पदाधिकाऱ्यांना तासभर ताटकळत राहावे लागले.
राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहे. कोरोना सेंटरमध्येही अनेक महिला शोषणाच्या बळी पडल्या. एक दिवसाआड महिला शोषणाची बातमी कानावर येते आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पारोळा येथील विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार करीत तिला मरण्यासाठी फेकून दिले होते. नंतर तिचा मृत्यू झाला. तसेच बोरखेडा ता. रावेर येथे चार भावंडांचे हत्याकांड झाले. त्यात मोठ्या मुलीवर अत्याचार झाला. त्यासोबत जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या फिर्यादी विविध पोलीस स्टेशनला दाखल होत आहेत. त्याचबरोबर महिला सुरक्षिततेबाबत काय उपाययोजना केल्या जाणार आहेत याविषयी माहितीपर निवेदन हे मंत्री ॲड. ठाकूर यांना भाजपतर्फे देण्यात येणार होते. मात्र जिल्हा परिषदेच्या गेटवर भाजपच्या महिला आघाडीचे निवेदन स्वीकारले गेले नाही. तसेच जिल्हा परिषदेच्या इमारतीत बोलावून देखील निवेदन घेण्यात आले नाही.
महिलांच्या समस्यांविषयी महिला व बालविकास मंत्री जर उदासीन असतील तर सर्वसामान्य महिलांनी न्याय कुणाकडे मागावा असे म्हणत भाजपच्या महिला आघाडीतर्फे जिल्हा परिषदेच्या गेटवर काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात, खाली डोके वर पाय, या सरकारचे करायचे काय अशा घोषणा देऊन मंत्री ठाकूर यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर भारती सोनवणे यांच्यासह महिला पदाधिकारी यांना पोलिसांनी धक्काबुक्की करून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकूर निवेदन घ्यायला आले नाही.
भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष तथा मनपाच्या स्थायी समिती सदस्या उज्ज्वला बेंडाळे म्हणाल्या की, महिलांच्या समस्याविषयी जर महिला व बालविकास मंत्री ऐकून घेणार नसतील तर महिलांच्या समस्या आम्ही मांडाव्या कोणाकडे ? जर जबाबदार मंत्री यांना काम करता येत नसेल तर त्यांनी खुर्च्या खाली करून मंत्रिपदाचे राजीनामे द्यावेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला अत्याचार वाढत आहे. त्याला थांबण्यासाठी कुठलीही प्रभावी उपाययोजना करताना राज्य सरकार दिसत नाही, असेही त्या म्हणाल्या. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष दीप्ती चिरमाडे, सरचिटणीस रेखा वर्मा, मनपाच्या महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेविका मिनाक्षी पाटील, ॲड.शुचिता हाडा, पार्वताबाई भिल, लता बाविस्कर, सरोज पाठक, सुरेखा अमृतकर, निलाताई चौधरी, संगीता वाघुळदे, वैशाली सोळंकी, रुकैया बी आदी यावेळी उपस्थित होते.