मुंबई : मध्यरात्री सर्व भारतीय गाढ झोपेत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात व्यस्त होतं. बीसीसीआयने केवळ निर्णय घेतले नाहीत, तर त्या नियमांची अंमलबजावणीदेखील केली आहे. बीसीसीआयने जलदगती गोलंदाज टी. नटराजन आणि इशांत शर्मा यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
या निर्णयामुळे नटराजनचं भारताच्या एकदिवसीय संघासाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण बीसीसीआयने त्याचा एकदिवसीय संघात समावेश केला आहे. नटराजनची भारताच्या टी-20 संघात यापूर्वीच निवड करण्यात आली आहे. तसेच बीसीसीआयचा दुसरा निर्णय जलदगती गोलंदाज इशांत शर्माबाबत आहे. बीसीसीआयने इशांतला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळलं आहे. इशांतची दुखापत हे यामागचं मुख्य कारण असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी जलदगती गोलंदाज नवदीप सैनीच्या पाठिला दुखापत झाली आहे. तो एकदिवसीय मालिका खेळू शकणार की नाही याबाबत सांशकता आहे. त्यामुळेच एकदिवसीय संघात सैनीच्या जागी नटराजनला संघात स्थान देण्यात आले आहे. संघात एका डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाची गरज होती, नटराजनच्या निवडीने ती पूर्ण झाली आहे.
इशांत शर्माला बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धा म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने याबाबत म्हटले आहे की, इशांत अद्याप पूर्णपणे फिट झालेला नाही. कसोटी मालिकेचा ताण घेऊ शकेल इतका फिटनेस अद्याप नसल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे.
बीसीसीआयने यावेळी धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या फिटनेसबाबतही अपडेट दिली. बीसीआयने सांगितले आहे की, 11 डिसेंबरला रोहित शर्माची फिटनेस टेस्ट होणार आहे. त्यानंतरच रोहित कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच बीसीसीआयने यावेळी सांगितले की, वडिल आजार असल्यामुळे आयपीएल संपताच रोहित मुंबईत परत आला होता. त्याच्या वडिलांची तब्येत आता बरी असून रोहित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाऊन फिटनेस ट्रेनिंग सुरु करणार आहे.
NEWS – T Natarajan added to India’s ODI squad
The All-India Senior Selection Committee has added T Natarajan to India’s squad for three-match ODI series against Australia starting Friday.
Updates on Rohit Sharma and Ishant Sharma’s fitness here – https://t.co/GIX8jgnHvI pic.twitter.com/VuDlKIpRcL
— BCCI (@BCCI) November 26, 2020