नवी दिल्ली : गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात एका कोविड रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत पाच रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. राजकोटमधील शिवानंद कोविड रुग्णालयाच्या आयसीयू कक्षामध्ये आग भडकली. या कक्षात ११ रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
देशात प्रत्येक राज्यांमध्ये कोविड रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. करोना रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालये कार्यरत असून, गुजरातमधील राजकोटमधील शिवानंद रुग्णालय कोविड रुग्णालये म्हणून सुरू आहे. या रुग्णालयाला गुरुवारी मध्यरात्री अचानक आग लागली. रुग्णालयातील आयसीयू कक्षात सर्वात आधी आगीचा भडका उडाला.
आग लागली त्यावेळी आयसीयू कक्षात ११ रुग्ण उपचार घेत होते. यापैकी पाच जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काही वेळानं आग नियंत्रणात आणण्यात यश आलं. या आगीत अनेक रुग्ण होरपळे आहेत. आगीत जखमी झालेल्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याचबरोबर शिवानंद रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या करोना रुग्णांनाही दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
रुग्णालयाला लागलेल्या आगीचे कारण नेमके कळू शकलेले नाही. रुग्णालयातील रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्याचे व अन्य कामांवर लक्ष दिले जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिले आहेत.