पंढरपूर : आज कार्तिकी एकादशीनिमित्त पहाटे अडीच ते साडेतीन वाजताच्या दरम्यान पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात महापूजा करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक महापूजा केली. यावर्षी श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेच्या मानाचे वारकरी कवडुजी नारायण भोयर (64) व कुसुमबाई कवडूजी भोयर (55, राहाणार डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) हे ठरले. उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीसह या मानाच्या वारकरी दाम्पत्याने महापूजेत सहभाग घेतला.
कोरोनामुळे निवडक लोकांच्या उपस्थितीत ही महापूजा करण्यात आली. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंर्त्यांसोबत श्रींच्या शासकीय महापूजेवेळी मानाचा वारकरी श्रीच्या दर्शन रांगेतून निवडला जातो व त्यांना शासकीय महापूजेची संधी दिली जाते. यावर्षी कार्तिकी यात्रा कोरोनाच्या सावटामुळे मर्यादित स्वरूपात साजरी केली जात आहे. 25 नोव्हेंबर 2020 ते 27 नोव्हेंबर 2020 या कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे.
कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठनी एकादशी देखील म्हटले जाते. यावेळी भगवान विष्णूचे चातुर्मास संपवून कार्तिकी एकादशी दिवशी उठतात. त्यामुळे देव शयनी नंतर चार महिन्यांनंतर येत असलेल्या देव उठनी एकादशीला विशेष महत्व आहे. देव निद्रा अवस्थेतून उठल्यानंतर पुन्हा नव्या शुभ पर्वाला, विवाह सोहळ्यांना प्रारंभ होतो.