जळगाव – शतपावली करणाऱ्या पोलिसासह एका तरुणाचा मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यास आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या चोरट्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. शुभम भिमराव वानखेडे (वय २४, रा. राहुलनगर, भुसावळ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात नियुक्तीस असलेले हेड कॉन्स्टेबल युवराज नागदुल (रा. भुसावळ) व विशाल विलास जैन (वय ३०, रा. श्रीरामनगर, भुसावळ) हे दि. ६ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० ते ११ वाजेच्या दरम्यान, यावल नाका परिसरात शतपावली करीत होते. फिरुन थकवा आल्यामुळे दोघेजण रस्त्याच्या कडेला बसले होते. यावेळी त्यांनी आपले मोबाईल बाजुला ठेवले होते. शेजारी येऊन बसलेल्या शुभमने काही मिनीटातच दोघांचे मोबाईल लांबवले. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच चोरलेल्या पैकी एक मोबाईल शुभमने काही दिवसांपूर्वी वापरण्यासाठी सुरू केला होता. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, शरीफ काझी, युनूस शेख, किशोर राठोड, विनाद पाटील, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, रणजीत जाधव, इद्रीस पठाण यांच्या पथकाने शुभमला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपासासाठी त्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.