जळगाव- शहरातील नाथवडा परिसरात दि. २५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता गरबा पाहण्यासाठी गेलेल्या दोन जणांवर कोणतेही कारण नसतांना प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हिरामण एकनाथ जोशी (वय ३०, रा. नाथवाडा) याला बुधवारी अटक केली.
नाथवाडा परिसरातील जागेश्वर मित्र मंडळाजवळ सुरू असलेला गरबा पाहण्यासाठी काही तरुण गेले होते. यावेळी काहीएक कारण नसतांना हिरामण जोशी व त्याच्या साथीदाराने लोखंडी रॉडने तरुणांवरव हल्ला केला होता. यात एका तरुणाचे डोके फुटले होते. या प्रकरणी एमअायडीसी पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा केल्यापासून हिरामण बेपत्ता झाला होता. तो नाथवाड्यात आल्याची माहिती मिळताच शरद भालेराव, कमलाकर बागुल, रामकृष्ण पाटील यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.