जळगाव प्रतिनिधी । सद्ररक्षणाय खलनिग्रणाय हे ब्रीद असलेल्या जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालायासमोर कुंटणखाना सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे जळगाव सेक्स रॅकेटनंतर पुन्हा चर्चेत आले आहे. काही दिवसांपुर्वी हनी ट्रॅप, राजकीय महिलेच्या कुंटणखान्याच्या चर्चेने जळगाव बदनाम झालेच आहे यात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच असलेल्या भजे गल्लीत आजचा प्रकार उघडकीस आल्याने पोलीसांच्या कार्यक्षमेतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच असलेल्या बसस्थानकानजीक भजे गल्लीतील हॉटेल साई गजानन पॅलेस लॉजिंगमध्ये सट्टा सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीसांनी त्याठिकामी छापा टाकला. याठिकाणी जुगार खेळताना कोणी आढळले नाही मात्र एका खोलीत एक तरूणी, एक तरूण आणि महिला आढळून आली. लॉजच्या नावावर कुंटनखाना सुरु असल्याच्या संशयावरुन जिल्हापेठ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असुन याबाबत शहरात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
गजबजलेल्या भागात हॉटेल साई गजानन पॅलेज, लॉजिंग आहे. या हॉटेलातील तळमजल्यावर असलेल्या खोलीत सट्टा सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी खात्री करण्यासाठी कर्मचार्याला पाठविले. खात्री केली असता सट्टा खेळत नसल्याने आढळले नाही. मात्र संबंधित हॉटेलातील तळमजल्यावर खोलीत तरुण, तरुणी व एक दोन मुले असलेली महिला मिळून आली. याबाबत पोलीस कर्मचार्याने पोलीस उपअधीक्षकांना प्रकार कळविला.
पोलीस उपअधीक्षकांना जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विलास शेंडे यांना तपासणी करुन नेमका काय प्रकार आहे, त्याबाबत चौकशीच्या सुचना केल्या. त्यानुसार विलास शेंडे, पोलीस उपनिरिक्षक किशोर पवार, योगेश साबळे यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठले. मिळून आलेल्या तरुण-तरुणी व महिलेला ताब्यात घेत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेले. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक किशोर पवार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनीही संबधित घटनास्थळाला भेट देवून सीसीटीव्ही तपासले. यात ताब्यात घेतलेले तरुण, महिला व तरुण संबंधित तळमजल्यावर खोलीत प्रवेश करताना दिसून येत आहे. हॉटेलला पोलिसांनी कुलूप ठोकले असून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे, उशीरापर्यंत जिल्हापेठ पोलीस निरिक्षकांकडून चौकशी तसेच कार्यवाही सुुरु असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.
हॉटेल मालकांने केली पोलीसांची दिशाभूल
पोलीसांनी हॉटेल मालकाबाबत विचारणा केली असता संबधिताने दुसर्या दिशेने हॉटेल मालक पळाल्याचा बनाव केला. पसार झालेल्या मालकाचे याप्रकरणात समावेश आहे का याचीही चौकशी केली असता तोच हॉटेल मालक निघाल्याने पोलीसांनीही कपाळावर हात ठेवले. संबंधित हॉटेलात 200 रुपयात लॉजिंगची सोय असल्याचे बोर्ड लावण्यात आले असून ग्राहकांना अंघोळ व शौचालयाासठी बाहेरच्या बाजूने सुविधा आहे. ज्या खोलीत महिला, तरुणी मिळून आली. त्या खोलीत तीन ते चार खोल्या असून त्यांना कुलूप लावलेले होते. तर इतर पंखा सुरु तसेच खोल्यांमध्ये पलंगांवर गाद्या अस्ताव्यस्त पडलेल्या तसेच एका पलंगावर तीन ते चार पेन पडलेले दिसून आले. एक प्लॉस्टिकचा टेबल तसेच खुर्च्याही याठिकाणी मिळून आल्या असून त्यासंबंधी पोलीस कर्मचारी कारवाई करत होते.