जळगाव – एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या शेजारीच असलेल्या हॉटेल प्रेसिडेंटमध्ये पैशांच्या लोभासाठी विना परवानगी वाद्य वाजंत्रीसह पार्टीचा कार्यक्रम करणार्या हॉटेल प्रेसिडेंटचे मालक मनोज अडवानी, मॅनेजर दिनेश मधुकर दुटे (43, रा.वाटीकाश्रम खोटेनगर), यांच्यासह वाद्य वाजविणार्या किशोर नागराज पाटील (भिकमचंद जैन नगर) या तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास हॉटेल प्रेसिडंटच्या आवारात लोकांची गर्दी जमवून, विना माक्स तसेच सोशल डिस्टन्सिंग याप्रमाणे शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा प्रकार घडला.
हॉटेल प्रेसिडंट याठिकाणी मोठ-मोठ्याने वाद्य वाजविण्याचा आवाज येत होता. यावेळी ठाणे अंमलदार जितेंद्र राठोड,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलीस कॉन्स्टेबल किशोर पाटील यांनी हॉटेल प्रेसिडेंट गाठले. याठिकाणी गर्दी लोक उभे होते, तसेच सोशल डिस्टन्सिंगसह काही लोकांच्या तोंडाला यावेळी मास्क नसल्याचे दिसून आले.
याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांनी हॉटेल मॅनेजर दिनेक दुटे ला कार्यक्रमाबाबत तसेच वाद्य वाजविण्याबाबत परवानगी आहे का ? याबाबत विचारले असता, त्याने पूल पार्टीचा कार्यक्रम असून परवानगी घेतली नसल्याचे साांगितले. परवानगी न घेता पार्टीचा कार्यक्रम, गर्दी करणे, सामाजिक अंतर न पाळणे, मास्क न वापरणे असे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर असलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने याप्रकरणी पोलीस कर्मचारी किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरुन हॉटेल प्रेसिडंटचे मालक मनोज आडवानी, मॅनेजर दिनेश कुटे व वाद्य वाजविणारा तरुण किशोर पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.