रावेर – आज सकाळी रावेर जळगाव मार्गावर झालेल्या बस अपघातात १० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून दुसऱ्या बसने त्यांना रवाना करण्यात आले .
आज सकाळी १० वाजेच्या सुमारास रावेर आगाराची बस जळगावकडे निघाली होती. या धावत्या बसचे पुढचे टायर अचानक फुटल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटून ती एका नाल्यात जाऊन पलटी झाली .
या अपघातात १० ते १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले . अपघाताची माहिती मिळाल्यावर भाजपचे नेते पद्माकर महाजन यांनी काही सहकारी आणि रुग्णवाहिका सोबत घेऊन घटना स्थळी धाव घेतली होती.
त्यांनी या जखमी प्रवाशांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले . त्यानंतर दुसरी बस बोलावून आगरप्रमुखांनी या प्रवाशांना जळगावकडे रवाना केले .