जळगाव – जगभरात कोरोना विषाणूने मोठे थैमान घेतले असून, दिवाळीच्या अगोदर कोरोना काही प्रमाणात कमी झाला होता, म्हणून राज्य शासनाकडून दिनांक 23 नोव्हेंबर पासून राज्यातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला होता.
तसेच त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन सूचना देखील निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. शासन परिपत्रक दिनांक १५ जून २०२० अन्वये स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांच्या सहाय्याने संबंधित शाळा व्यवस्थापन समिती यांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत.
तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून करून देण्यात आलेली आहे, तसेच जळगाव जिल्ह्यातील सद्यस्थिती पाहता ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ आणि दिवाळी सणाच्या कालावधीनंतर मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यात नागरिकांचे प्रवास झाल्याने कोविड – १९ प्रादुर्भावाच्या अनुषंगाने होणारे संभाव्य परिणाम आणि शालेय व्यवस्थापन समिती व पालक संघ यांच्याकडून प्राप्त झालेल्या अभिप्राय लक्षात घेता सद्यस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग आश्रम शाळा वस्तीगृह अशा परिस्थितीमध्ये सुरू करणे उचित ठरणार नाही.
म्हणून जळगाव जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावी वर्ग, आश्रमशाळा, वसतिगृह दि. १७ डिसेंबर २०२० पर्यंत सुरू होणार नाहीत, मात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची सुविधा सुरू राहील. असे आदेश अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.