जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील शाळा या उद्यापासून शाळा सुरू करण्याचा निर्णय ७ डिसेंबर पर्यंत प्रलंबीत ठेवण्यात आला आहे. अर्थात, तोवर शाळा बंदच राहणार असून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.जळगाव जिल्ह्यात ७ डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यतच्या शाळा सोमवारपासून (दि.२३) सुरु करण्यात येणार आहेत. मात्र, जिल्ह्यात नेमक्या शाळा केव्हा सुरू होणार याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. यातच पालकांची संमती असेल त्याच विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल. सक्ती करता येणार नाही. आगामी परिस्थिती, रुग्णसंख्या पाहून आवश्यकता भासेल तेव्हा शाळा बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात येतील, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी सांगितले होते.
दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाच्या रूग्णांमध्ये हळूहळू वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यातच दुसर्या लाटेचा धोका देखील दिसून येत आहे. या पार्श्वभूमिवर, शाळा तातडीने सुरू न करण्याचा निर्णय योग्य राहील असे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते. यानुसार आज जिल्हाधिकार्यांनी नोटिफिकेशन काढून जिल्ह्यातील शाळा ७ डिसेंबर पर्यंत बंदच राहतील असे जाहीर केले आहे.