नवी दिल्ली – खाद्यतेलाच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ही बाब सरकारच्या चिंतेचे कारण बनले आहे. शेंगदाणा, मोहरी, डालडा, सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेल या सर्व खाद्यतेलांच्या सरासरी किंमती वाढल्या आहेत. पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या बाबतीत मागील एका वर्षात २०-३०% पर्यंत वाढ झाली आहे.
३०,००० टन कांद्याच्या आयातीमुळे कांद्याचा भाव उतरला आहे, तर बटाट्याचा भाव स्थिरावला आहे. पण खाद्यतेलाच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हा विषय या आठवड्याच्या सुरुवातीला गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्र्यांच्या गटासमोर एका सादरीकरणात मुख्य अजेंड्यावर होता.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून प्रदर्शित केलेल्या डेटानुसार गुरुवारी मस्टर्ड ऑईलचा सरासरी भाव हा १२० रुपये प्रति लिटर एवढा होता. गुरुवारी मोहरीच्या तेलाची सरासरी किंमत १२० रुपये प्रतिलिटर होती. डालडाची किंमत १०२.५ प्रति किलो पर्यंत वाढली आहे, जी मागच्या वर्षी ७५.२५ प्रति किलो एवढी होती. सोयाबीन तेलाची साधारण किंमत ११० रुपये प्रति लीटर होती, तर २०१९ मध्ये १८ऑक्टोबरला सरासरी किंमत ९० होती.
सूर्यफूल आणि पामच्या बाबतीतही असाच ट्रेंड आहे. प्राप्त माहितीनुसार, मलेशियात मागील सहा महिन्यात पाम ऑईलच्या उत्पादनातील घट हे खाद्य तेलांच्या वाढत्या किंमती मागील मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. देशातील पाम तेलापैकी जवळजवळ ७०% तेल प्रोसेस्ड फूड उद्योगाद्वारे वापरले जाते. पाम तेलाच्या किंमतीवरील आयात शुल्क कमी करायचे की नाही याचा निर्णय आता सरकारचा आहे. पाम तेलाच्या किंमतींचा अन्य खाद्यतेलांच्या किंमतींवर थेट परिणाम होतो.