भुसावळ – तालुक्यातील गोजोरा येथे जुन्या घराचे खोदकाम करतांना चांदीची नाणी आढळून आली असून याबाबतची माहिती पोलीस स्थानकात देण्यात आली आहे. गोजोरा येथील रहिवासी परशुराम ज्ञानदेव राणे यांच्या जुन्या घराची भिंत पाडण्याचे काम सुरू असतांना १९ चांदीची नाणी आढळून आली.
याबाबत स्थानिक पोलिस पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहायक निरीक्षक अमोल पवार यांनी घटनास्थळी पाहणी केली.
खोदकाम करतांना आढळून आलेल्या नाण्यांमध्ये १८६२, १८७२, १८८६ आणि १९०१ या वर्षांचा उल्लेख असणार्या नाण्यांचा समावेश आहे. सहायक निरीक्षक अमोल पवार व नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांनी पंचनामा करून सर्व नाणी ताब्यात घेतली. यावेळी हवालदार विठ्ठल फुसे , युनूस शेख व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.