जळगाव प्रतिनिधी । जळगावात ८ वर्षीय बालकाचे अपहरण; आई बेपत्ता. शहरातील शिवाजीनगरातल्या हुडको भागातून आठ वर्षाच्या बालकाचे अपहरण करण्यात आले असून यानंतर त्याची आई जिल्हा रूग्णालय परिसरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर हुडको परिसरात सुनील विश्वनाथ भागीरथे (३०) हा वास्तव्यास आहे.
घरात त्याची प्रेयसी माया अभिनंदन काशीकापडणे, तिचा मुलगा आदित्य व मुलगी मोनाली आदींसह अन्य सोबत राहतात. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे सुनील कामावर गेल्यावर त्याला वडीलांचा फोन आला. त्यांनी सांगितले की मी, माया व नात मोनालीसोबत सिव्हीलला औषधे घेण्यासाठी गेलो होतो. तेव्हा घराबाहेर आदित्य हा भाचा डिगंबरसोबत खेळत होता.
याचवेळी अज्ञात लोकांनी आदित्यचे फूस लावून अपहरण केले. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात औषधी घेण्यासाठी गेलेली माया बराचवेळ झाला तरी परत आली नाही. माया व आदित्य यांचा सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही. याप्रकरणी हरवल्याची तक्रार जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिली आहे.