जळगाव – तालुक्यातील भोलाणे येथे भाऊबिजेच्याच दिवशी बहिण-भावाने विषारी औषध प्राशन केल्याची घटना काल सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. यामुळे बहिणीचा मृत्यू झाला असून भावाला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
तालुक्यातील भोलाणे येथील रहिवासी विश्वजित विजय सपकाळे (वय-२१) आणि अश्विता विजय सपकाळे (वय-१८) हे दोन्ही भाऊबहिण आईवडीलांसोबत राहतात. दोघे मुंबई येथे उच्चशिक्षण व नोकरी करत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे दोघे बहिणभाऊ घरीच बसून काम व अभ्यास करत होते. या दोघांनी सोमवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पिक फवारणीचे औषध घेतले.
आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल दोघांनी का उचलले हे अजूनही कळू शकले नाही. दोघांना अत्यवस्थ पाहून नातेवाईकांना तातडीने जळगाव शहरातील खासगी रूग्णालयात हलविले. मात्र रात्री ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास अश्विताचा वाटेतच मृत्यू झाला.
तर विश्वजित याला अत्यवस्थ अवस्थेत खासगी रूग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. याप्रकरणी अजूनही पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.