मुंबई : एकनाथराव खडसे भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पहिलाच दौरा खान्देशमध्ये नियोजित करण्यात आला होता. पण, सोमवारी हा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. खान्देशमध्ये पवारांचा हा दौरा काही दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठा हादरा बसला आहे. भाजपच्या शेकडो कार्यकर्ते हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. त्यामुळे हळूहळू राष्ट्रवादीची उत्तर महाराष्ट्रात पकड मजबूत होत चालली आहे. अशातच शरद पवार यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यातून शरद पवार हे भाजपच्या गडात शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत होते. पण, सोमवारी रात्री उशिरा उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द करण्याची आला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. 15 नोव्हेंबर रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना तातडीनं जळगावमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
रोहिणी खडसे यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे एकनाथ खडसे यांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळेच शरद पवार यांना उत्तर महाराष्ट्रातला नियोजित दौरा हा तुर्तास रद्द करावा लागला आहे.
एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे यामुळे उत्तर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शेकडो भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. जिल्ह्यातील आणखी काही भाजपचे आजी माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती खुद्द एकनाथराव खडसे यांनीच जाहीरपणे दिली होती. त्यामुळे शरद पवारांच्या दौऱ्यात हा प्रवेश सोहळा होण्याची शक्यता होती. पण, दौरा रद्द करण्यात आल्यामुळे हे कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आले आहे. अद्याप राष्ट्रवादीकडून अधिकृतरित्या दौरा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली नाही. मात्र, एकनाथ खडसे हेच क्वारंटाइन असल्यामुळे शरद पवारांना दौरा पुढे ढकलावा लागणार आहे.
अजून वाचा
एकनाथराव खडसेंचा २२ ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश?