नवी दिल्ली – सध्या देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असला तरी, अजूनही करोनाबाधितांच्या व करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत दररोज भर पडतच आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील २४ तासांमध्ये ४३ हजार ८५१जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
सणासुदीच्या काळात लोक मोठ्याप्रमाणावर घराबाहेर पडत असल्याने, संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मागील २४ तासांत देशभरात ३० हजार ५४८ नवे करोनाबाधित आढळले असून, ४३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८८ लाख ४५ हजार १२७ वर पोहचली आहे. सध्या देशात ४ लाख ६५ हजार ४७८ अॅक्टिव्ह केसेस असून, १ लाख ३० हजार ७० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. याचबरोबर आतापर्यंत ८२ लाख ४९ हजार ५७९ जणांनी करोनावर मात केली आहे.
१५ नोव्हेंबरपर्यंत देशभरात करोनाच्या पार्श्वभूमीवर १२,५६,९८,५२५ नमूने तपासण्यात आले. यापैकी ८ लाख ६१ हजार ७०६ नमुन्यांची काल तपासणी झाली असल्याची माहिती आयसीएमआरकडून मिळाली आहे.
जगभरात करोनाची दुसरी लाट आल्याचे बोलले जात असताना, भारतातील परिस्थिती काहीसी दिलासादायक दिसत आहे. सध्या भारतात सध्या १० लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी ६ हजार ३८७ रुग्ण आहेत. तर त्यातही दिलासादायक बाब म्हणजे १५ राज्य व केंद्रशासीत प्रदेश असे आहेत, जिथं देशाच्या सरासरीपेक्षा कमी रुग्ण आहेत.