जळगाव – बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या शेजारील अमर गणेश मंडळाच्या वतीने ‘जळगावचा गणराज’ गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पाठपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. ढोल-ताशांचा गजर, आकर्षक लाईट शो आणि भक्तिमय वातावरणामुळे परिसर गणेशोत्सवाच्या उत्साहाने भारून गेला होता.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शरद तायडे, सागर सपके, विशाल भोळे, मनोज चौधरी, किशोर भोसले, सुरज दायमा, पियुष गांधी आणि पियुष पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ‘जळगावचा गणराज’ची आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत परिसर दुमदुमून सोडला.
श्रावण सोमवारचे औचित्य साधून मंडळाच्या वतीने भाविक व उपस्थितांसाठी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कार्यक्रमातील आकर्षक लाईट शो आणि विश्वगर्जना ढोल पथकाच्या दमदार ढोलवादनाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांच्या निनादाने परिसर दुमदुमून गेला, तर रंगीबेरंगी लाईट शोमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
‘जळगावचा गणराज’च्या आगमनाची चाहूल लागताच परिसरातील गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमर गणेश मंडळाच्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवाची भक्तिमय सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष बबलू भोई, उपाध्यक्ष जितू दाभाडे, सदस्य अनिरुद्ध तिवारी, सदस्य जगदीश वाघमारे यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

