जळगाव प्रतिनिधी – मेहरूण तलाव परिसरातील सिद्धार्थ लॉन येथे योग शिक्षक श्री. सुनील गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ओम योगा ग्रुपला यंदा १४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने योगसाधकांसाठी योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेला योगप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी योग शिक्षक श्री. सुनील गुरव यांनी परीक्षकांचा परिचय करून देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. स्पर्धेसाठी एकूण १५ योगसाधक सहभागी झाले होते. परीक्षक म्हणून योग पंडित श्री. अरविंद सापकर व योग पंडित डॉ. भावना चौधरी यांनी उपस्थित राहून स्पर्धकांच्या योगासनांचे मूल्यमापन केले.
स्पर्धेपूर्वी सलग दहा दिवस श्री. सुनील गुरव यांनी स्पर्धेतील विविध योगासनांचा नियमित सराव योगसाधकांकडून करून घेतला होता. त्यामुळे स्पर्धकांनी आत्मविश्वासाने व उत्कृष्ट पद्धतीने योगासनांचे सादरीकरण केले.
स्पर्धेत डॉ. दिलीप पाटील, श्री. होरिलसिंग राजपूत, श्री. गणेश राणे, श्री. प्रशांत शिंदे, डॉ. पंकज पाटील, सौ. माधुरी पाटील, श्री. गोपाल चुघरा, श्री. नरेश कावणा, श्री. सुरेश जोशी, श्री. अजितकुमार जैन, श्री. प्रेम कटारिया, प्रा. निलेश घडेकर, श्री. राजेश हिंगू, श्री. विजय कुकरेजा आणि श्री. प्रमोद संचेती यांनी सहभाग नोंदविला.
समारोप प्रसंगी परीक्षकांनी योगसाधकांचे कौतुक करत नियमित योगाभ्यासाचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन योग शिक्षक श्री. सुनील गुरव यांनी केले.

