जळगाव प्रतिनिधी – जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जीवणे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा दालनात एमएससीबी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अतिवृष्टीच्या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा तसेच झाडांच्या फांद्यांच्या छाटणीसंदर्भातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
बैठकीस एमएससीबी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. साळी, अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त, शहर अभियंता तसेच आरोग्य विभागाचे अभियंते उपस्थित होते.
अतिवृष्टीच्या काळात वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची एमएससीबीकडून छाटणी केली जाते. मात्र, छाटणीनंतर अनेक ठिकाणी फांद्या रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी पडून राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो, अशी बाब बैठकीत निदर्शनास आली.
यावेळी आयुक्त आदित्य जीवणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की, यापुढे एमएससीबी विभागाने छाटणी केलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ उचलून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची राहील. कोणत्याही परिस्थितीत छाटलेल्या फांद्या रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी पडून राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले.
छाटणीबरोबरच स्वच्छता आणि सुरक्षिततेलाही तितकेच महत्त्व देऊन कामकाज करावे, अशा सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्या.


