जळगाव – धरणगाव तालुक्यातील साळवा येथे ७ मे रोजी हिलाल माधव पाटील यांच्या खळ्याला आग लागल्याची घटना घडली. खळ्यात जनावरे बांधलेली असल्याने ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ जनावरांना सुरक्षित स्थळी हलवले. मात्र या दुर्घटनेत एक गाय सुमारे ६० ते ७० टक्के भाजली.
घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय चिकित्सालय सोनवद येथील पशुधन पर्यवेक्षक नितीन जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन बाधित गायीवर प्राथमिक उपचार केले. तसेच पशुपालकांनी शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९६२ वर संपर्क साधून उपचारासाठी मदत मागितली.
या घटनेची दखल घेत जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध विकास जळगाव डॉ. प्रदीप झोड यांनी धरणगाव येथील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अशोक महाजन यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार धरणगाव फिरते पशुवैद्यकीय पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
फिरते पथक प्रमुख पशुधन विकास अधिकारी डॉ. गुंजरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन पर्यवेक्षक भूषण पाटील, परिचर सनी पाटील व श्री. गोतरने यांनी दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही घटनास्थळी भेट देऊन बाधित गाय व इतर जनावरांची तपासणी केली. संबंधित जनावरांवर आवश्यक औषधोपचार करण्यात आले.
उपचारानंतर संबंधित गाय चारा व पाणी व्यवस्थित घेत असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली. वेळेत उपचार मिळाल्यामुळे गायीचे प्राण वाचवण्यात यश आल्याने पशुपालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

