जळगाव – आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईलमध्ये अधिक गुंतत चालली आहेत. अशा परिस्थितीत त्यांना मानवी मूल्ये शिकवणारे आणि संवेदनशीलता वाढवणारे चित्रपट दाखवणे गरजेचे आहे. बालचित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून मुलांमध्ये सामाजिक भान आणि कलेची आवड निर्माण होईल, असा विश्वास महापौर दीपमाला काळे यांनी व्यक्त केला.
अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
शहरातील भाऊंचे उद्यान येथे दि. २४, २५ आणि २६ एप्रिलदरम्यान दररोज सायंकाळी ६.३० वाजता या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पाल्यांसोबत पालकांनाही आपले बालपण पुन्हा अनुभवता यावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अजिंठा फिल्म सोसायटीच्या विश्वस्त डॉ. श्रद्धा पाटील शुक्ल यांनी प्रास्ताविक केले. महापौर दीपमाला काळे यांचे स्वागत जयेंद्र लेकुरवाळे आणि विनोद ढगे यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मनोगतात महापौर काळे यांनी भविष्यात अशा उपक्रमांना महानगरपालिकेचे सहकार्य राहील, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा गोडबोले यांनी केले, तर आभार प्रदर्शन वर्षा उपाध्ये यांनी केले. यावेळी व्यासपीठावर विनीत जोशी, डॉ. संजय हांडे, किरण सोहळे, रत्नाकर पाटील, डॉ. विद्या पाटील, शैलेश शिरसाठ आणि योगेश शुक्ल उपस्थित होते.
उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी ४थ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलमधील सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ‘शाळा सुटली’ तसेच ‘बेबीज डे आउट’ या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. या चित्रपटांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, जास्तीत जास्त मुलांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


