भुसावळ (दिव्य जळगाव) – शहरात व राज्यभरात चैन स्नॅचिंग (साखळी चोरी) करून दहशत माजवणारा कुख्यात गुन्हेगार सादिक अली उर्फ ‘आतंक’ इबादत अली इराणी याला भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने (DB पथक) अटक केली आहे. अनेक जिल्ह्यांतील गुन्ह्यांमध्ये तो फरार असून पोलिसांच्या रडारवर होता.
मिळालेल्या माहितीनुसार, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपीच्या हालचालींबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार डी.बी. पथकाने सापळा रचत अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता.
अनेक जिल्ह्यांत गुन्ह्यांची मालिका तपासात समोर आले की, आरोपी सादिक अली याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये चैन स्नॅचिंगचे गुन्हे केले आहेत. जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुका, जिल्हापेठ, चाळीसगाव शहर व ग्रामीण भागासह वर्धा, बुलढाणा (शेगाव, नांदुरा, खामगाव), धुळे आणि संभाजीनगर या ठिकाणीही तो ‘मोस्ट वॉन्टेड’ होता.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही धडक कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील हवालदार विजय नेरकर, कांतीलाल केदारे, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, योगेश माळी, जावेद शहा, दिलीप कोल्हे, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, अमर आढाले, चंद्रकांत रायपूरकर, कोतकर व जीवन कपडे यांनी ही कारवाई यशस्वी केली.
अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता
या कुख्यात आरोपीच्या अटकेमुळे राज्यभरातील चैन स्नॅचिंगच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाने पथकाचे कौतुक केले आहे.


