जळगाव – जळगाव महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १ च्या नवनिर्वाचित नगरसेविका रिटाताई विनोद सपकाळे यांचे पती विनोद उर्फ पिंटू सपकाळे यांचे शनिवार, दिनांक ४ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रभागासह शहरात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, वहिनी, मुलगा व मोठा परिवार असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी प्रभागात समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांनी शोक व्यक्त केला.
कट्टर सामाजिक कार्यकर्ता हरपला
पिंटू सपकाळे हे प्रभागातील एक सक्रिय व कट्टर सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या अनेक वर्षांच्या परिश्रमाचे स्वप्न पूर्ण झाले होते. त्यांनी पत्नी रिटा सपकाळे यांना निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर त्यांनी प्रभागातील विकासकामे आणि स्वच्छता व्यवस्थेकडे विशेष लक्ष देत काम सुरू केले होते. दररोज सकाळी प्रभागातील साफसफाई व नागरिकांच्या समस्यांवर लक्ष ठेवणे हा त्यांचा दिनक्रम होता.
राजकीय प्रवास
पिंटू सपकाळे हे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक म्हणून शहरात परिचित होते. सध्या सुरेशदादा जैन राजकारणात सक्रिय नसल्या कारणाने त्यांनी नितीन लड्डा, सुनील महाजन आणि जयश्री महाजन आदींसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर या जानेवारीतच झालेल्या निवडणुकीत रिटा सपकाळे यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला. त्या विजयला दोन महिने ही पूर्ण झाले नसून हा दुःखाच डोगर त्यांचा कुटूंबावर कोसळला.
कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी
पिंटू सपकाळे यांच्या कुटुंबाचीही स्थानिक राजकारणात ओळख आहे. त्यांचे मोठे भाऊ स्व. अजयभाऊ सपकाळे हे देखील जळगाव महानगरपालिकेचे माजी नगरसेवक म्हणून कार्यरत होते.
महासभेत शेवटची उपस्थिती
गेल्या सोमवारी दि.30 मार्च 2026 झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेत ते पत्नींसोबत उपस्थित होते, कदाचित त्यावेळेस त्यांची तब्येत बरी नसल्याने ते सभागृहातून पत्नीसह लवकर ही निघून गेले होते.
आज त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने प्रभागात आणि शहरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

