जळगाव – बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा २०२६ ची निवडणूक मंगळवार, दि. २४ मार्च रोजी पार पडणार असून यंदा जळगाव शहरातून दोन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ॲड. गुलाबसिंग मानसिंग पाटील आणि ॲड. रेखा घनश्याम कोचुरे हे या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार आहेत.
यामध्ये ॲड. रेखा घनश्याम कोचुरे यांनी उमेदवारी दाखल करून एक नवा इतिहास घडवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. जळगाव न्यायालयातून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणूक लढवणाऱ्या त्या पहिल्या महिला उमेदवार ठरल्या आहेत. यापूर्वी ॲड. एल. एल. बेंडाळे, ॲड. भरत देशमुख आदींनी प्रतिनिधित्व केले असले, तरी महिला उमेदवार कधीच पुढे आलेली नव्हती.
या निवडणुकीत एकूण २३ सदस्यांची निवड होणार असून त्यामध्ये ५ महिलांसाठी जागा राखीव आहेत. तसेच २ महिला को-ऑप्ट सदस्यांची निवड नंतर करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण सदस्यसंख्या २५ असेल. दरम्यान, ॲड. रेखा कोचुरे विजयी झाल्यास त्या खानदेशातून बार कौन्सिलवर निवडून जाणाऱ्या पहिल्या महिला सदस्य ठरतील. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण वकिल समुदायाचे लक्ष लागले आहे.

