जळगाव – वाहतूक विभागाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार, दुचाकी खरेदी केल्यानंतर आधी तात्पुरती नोंदणी करणे आवश्यक असते. मात्र असे असताना देखील तात्पुरती नोंदणी न करता विना कागदपत्र ३० नवीन दुचाकी शुक्रवारी मुंबईतून जळगावात दाखल झाल्या. याबाबत शहरातील अधिकृत वाहन कंपन्यांच्या डिलर्सने तक्रार केल्यानंतर दुपारी एमआयडीसी पोलिसांनी त्या तीस दुचाकी जप्त केल्या आहेत.
या प्रकरणाची चौकशी पोलीस करीत असून चौकशीअंती कारवाई केली जाणार आहे. मुंबईतून जळगावात काही माल ट्रकांमधून नवीन दुचाकी विक्रीसाठी आल्याची माहिती किरण बच्छाव, टीव्हीएस कंपनीचे योगेश चौधरी, होंडा कंपनीचे प्रकाश जाखेटे यांना मिळाली होती. त्यांनी शुक्रवारी दीड वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुली एमएच.४८.एजी.०४२६ या क्रमांकाचा आयशर ट्रक थांबविला असता, त्यामध्ये तीस नवीन दुचाकी दिसून आल्या.
तिघांनी आयशर ट्रकचालक गुरूप्रसाद मिश्रा याला डिलीव्हरी चलन आहे का? अशी विचारणा केली. त्यावर त्याने नकार दिला व भिवंडीतून दुचाकी आणल्याची माहिती त्याने दिली. त्यामुळे शहरात अधिकृत डिलर्स असताना बाहेरून परस्पर विक्रीला दुचाकी आल्या कशा? असा प्रश्न विचारत किरण बच्छाव यांनी एमआयडीसी पोलिसात चौकशीसाठी अर्ज दिला़, त्यानुसार पोलिसांनी आयशर ट्रकची पाहणी केल्यानंतर त्यांना त्यात २८ लाख १६ हजार ४५० रूपयांच्या तीस नवीन मोटारसायकली आढळून आल्या. विशेष म्हणजे, दुचाकी खरेदी केल्यानंतर ती रस्त्यावर आणण्यापूर्वी तात्पुरती नोंदणी करणे आवश्यक असते.
त्या नवीन दुचाकींची तात्पुरती नोंदणी सुध्दा केलेली नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत आढळून आले. फक्त विमा काढून त्या शहरात पाठविण्यात आल्या होत्या. चालकाला दुचाकींचे कागदपत्र विचारले असता, त्याने पोलिसांना कागदपत्र नसल्याचे सांगितले.
अखेर संपूर्ण चौकशीसाठी एमआयडीसी पोलिसांनी त्या नवीन तीस दुचाकी जप्त केल्या आहेत. तर चालकाला संबंधित वाहनांचे आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी लेखी समज पोलिसांनी दिली आहे. तसेच चौकशीअंती कारवाई केली जाणार आहे. याप्रकरणी चौकशी पोलीस उपनिरिक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील करीत आहेत.
या परस्पर दुचाकी विक्रीमुळे डिलर्सला आर्थिक फटका बसतो. तसेच शोरूम पेक्षा कमी किंमतीत दुचाकी मिळत असल्यामुळे त्या बुकींग करण्यात आल्या, असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता असून याबाबत पोलीस तपास करीत आहेत.