जळगाव – जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक १३ मधून महायुतीच्या वतीने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे पुत्र प्रफुल देवकर यांनी उमेदवारी दाखल केली असून आज त्यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.
जळगाव शहरातील रायसोनी नगरा येथील महादेव मंदिरात नारळ फोडून व महाआरती करून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला. या वेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते महादेवाची महाआरती करण्यात आली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महादेवाच्या चरणी नतमस्तक होत जनतेच्या आशीर्वादाने विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचा निर्धार प्रफुल देवकर यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीचा प्रचार आता वेग घेणार असून देवकर कुटुंबाच्या राजकीय वारशाला मतदार कितपत साथ देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जळगाव महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाआरतीद्वारे महायुतीने प्रभावी आणि ठोस सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


