जळगाव – जळगाव जिल्ह्यात सध्या विविध विकासकामे सुरू असून मेडिकल हब, उड्डाणपूल, चौपदरी रस्ते अशा अनेक प्रकल्पांची अंमलबजावणी होत आहे. आता जळगाव शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असून मधल्या काळात काही लोकांनी साथ सोडल्यामुळे विकास रखडला. मात्र येत्या दोन वर्षांत जळगावचा चेहरामोहरा बदलून दाखवू, असा शब्द संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी पिंप्राळा येथे आयोजित प्रचारसभेत दिला.
विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राच्या धर्तीवर विकसित जळगाव घडवण्यासाठी महायुतीला साथ द्या, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केले.
जळगाव शहर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळा येथील भवानी माता मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली.
या सभेला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, निवडणूक प्रमुख आमदार सुरेश भोळे, निवडणूक प्रभारी आमदार मंगेश चव्हाण, शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, आमदार अमोल जावळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. केतकी पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी तसेच महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले, तर बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कारही करण्यात आला.
सभेत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. उबाठा गटाची ताकद संपुष्टात आली असून त्यांच्या मशालीत तेल उरलेले नाही. शरद पवार गटाचा राज्यात कुठेही प्रभाव राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारांकडून विकासाची अपेक्षा कशी ठेवायची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यात सर्वत्र महायुतीचे सरकार असल्याने जळगाव महापालिकेतही महायुतीचेच उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे. जळगाव महापालिकेच्या ७५ पैकी सर्व जागा महायुती जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मधल्या काळात सत्ता असूनही काही लोक पळून गेल्याने विकास थांबला, मात्र आता दोन वर्षांत जळगावचा चेहरा पूर्णपणे बदलून दाखवू, असे आश्वासन त्यांनी दिले.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनीही पहिल्याच सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता जळगावात महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत व विकसित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणली जात असून विकसित जळगावसाठी महायुतीच्या उमेदवारांना शंभर टक्के साथ देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.


