जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्त चरित्र वाचन सत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचून संविधानाप्रती निष्ठा व लोकशाही मूल्यांप्रती बांधिलकी व्यक्त केली.
यानंतर झालेल्या चरित्र वाचन सत्रात विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या महत्वपूर्ण जीवनकार्य, भारतीय संविधान निर्मितीतील मोलाचे योगदान, शिक्षणावरील त्यांचा कटाक्ष, सामाजिक समानता व न्यायासाठीचा अथक संघर्ष, तसेच त्यांच्या सामाजिक कार्यांवर आधारित निवडक लेख प्रभावीपणे वाचून दाखविले.
विद्यार्थ्यांच्या भावपूर्ण वाचनातून डॉ. आंबेडकर यांचे विचार, तत्त्वज्ञान आणि समाजपरिवर्तनासाठी केलेले योगदान अधिक प्रभावीपणे उजळून निघाले. या उपक्रमामुळे शाळेत संविधानिक मूल्यांची जाण, मानवता, बंधुता आणि समान हक्कांची जाणीव दृढ झाली.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संविधानाचा आदर, शिक्षणाचे महत्त्व आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


