जळगाव – जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसाठी रक्त मिळत नसल्याने हाका मारल्या जात होत्या. त्याच वेळी गावाचे सरपंच प्रल्हाद चव्हाण यांच्या विनंतीवरून गिरीशभाऊ महाजन यांचे आरोग्यदूत पै.शिवाजी पाटील धावले आणि स्वतः रक्तदान करून बालिकेचा जीव वाचवला. हे त्यांचे तब्बल ५६ वे रक्तदान ठरले.
रक्तासाठी सर्वत्र धावाधाव
खुशी भानुदास चव्हाण (वय २ वर्षे) ही बालिका कावीळ आणि निमोनियाने आजारी असून जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे. तिची प्रकृती गंभीर झाल्याने रक्ताची तातडीची गरज निर्माण झाली होती. मात्र, रुग्णालयात आणि रक्तपेढ्यांमध्ये रक्त उपलब्ध होत नसल्याने नातेवाईकांनी गावचे सरपंच प्रल्हाद चव्हाण यांच्याशी संपर्क साधला.
आरोग्यदूत ठरले संकटमोचक
सामाजिक कार्यात सदैव अग्रस्थानी असणारे पै.शिवाजी पाटील हे गिरीशभाऊ महाजन यांचे आरोग्यदूत म्हणून ओळखले जातात. सरपंचांनी मदतीसाठी संपर्क साधताच त्यांनी तात्काळ पुढाकार घेत अनेक ठिकाणी रक्तासाठी प्रयत्न केले. मात्र, रक्त उपलब्ध होत नव्हते. अखेरीस, रेड क्रॉसशी संपर्क साधल्यानंतर संस्थेने सांगितले की, “डोनर उपलब्ध झाला, तरच रक्तपुरवठा होईल.”
क्षणाचाही विलंब न करता रक्तदान
या परिस्थितीत शिवाजी पाटील यांनी विलंब न लावता स्वतः रक्तदान केले. त्यांच्यामुळे बालिकेला आवश्यक ते रक्त वेळीच मिळाले आणि उपचारात मोठी मदत झाली. यापूर्वीही त्यांनी ५५ वेळा रक्तदान केले असून, हे त्यांचे ५६ वे रक्तदान ठरले.
कृतज्ञतेचा वर्षाव
या अमूल्य मदतीबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी पै.शिवाजी पाटील यांचे तसेच त्यांना प्रेरणा देणारे माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे आभार मानले. एका हाकेला धावून जाऊन दोन वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचवणाऱ्या या आरोग्यदूताचे कार्य खरोखरच प्रेरणादायक आणि अनुकरणीय ठरले आहे.

