जळगाव – इम्पिरियल प्री-प्रायमरी स्कूल, जळगाव येथे आज ‘ब्लू डे’ मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसरात आज निळ्या रंगाची रंगत अनुभवायला मिळाली. हा विशेष दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा आणि शिकवणूक देणारा ठरला.
या दिवशी मुलांनी आपल्या कल्पकतेने सजवलेले रेनकोट्स, आकर्षक निळ्या रंगाच्या छत्र्या आणि ड्रेस घालून शाळेत हजेरी लावली. काही मुलांनी निळ्या रंगाशी संबंधित वस्तू, खेळणी, चित्रे आणली होती. शाळेच्या आवारात जणू निसर्गाची निळाई उतरली होती.
कार्यक्रमात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना रंगांचे महत्त्व समजावून सांगितले गेले. विशेषतः ‘ब्लू’ या रंगाशी निसर्गाचा, शांततेचा आणि पावसाळ्याचा संबंध कसा आहे, हे शिक्षकांनी कथाकथन, गाणी, चित्रे व खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रभावीपणे समजावले.
पालकांनीही आपल्या पाल्यांची मनापासून तयारी करून त्यांना सुंदर पोशाखात सजवून पाठवले होते. विद्यार्थ्यांचा उसळता उत्साह, शिक्षकांची परिश्रमपूर्वक तयारी आणि पालकांचे सक्रिय सहकार्य यामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला.
या कार्यक्रमास स्कूलच्या डायरेक्टर शोभादेवी नरेश चौधरी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शिक्षकांचे व पालकांचे मनःपूर्वक आभार मानले.
‘ब्लू डे’ च्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी रंगांचा अनुभव हा एक आनंददायक व शैक्षणिक उपक्रम ठरला.


