जळगाव – विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाला ईव्हीएम यंत्रणाच जबाबदार असल्याचा सूर रविवारी उबाठा गटाच्या मेळाव्यात पदाधिकार्यांकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान जिल्हा मेळाव्यात पदाधिकार्यांनी पराभवावर मंथन केले.
विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा जिल्हा मेळावा रविवारी राधाकृष्ण मंगल कार्यालयात पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जळगावचे संपर्कप्रमुख डॉ. संजय सावंत होते. तर व्यासपीठावर सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, नवनियुक्त जळगाव लोकसभा संघटक करण पवार, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, वैशाली सूर्यवंशी, महिला संघटक महानंदा पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, धरणगावचे माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, रमेश माणिक पाटील, यांच्यासह तालुकाप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्यात रमेश माणिक पाटील, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, पाचोराचे तालुकाप्रमुख यांच्यासह पदाधिकार्यांनी पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले. ज्याठिकाणी ईव्हीएम बंद पडत होते, त्याठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर होते असा दावा पदाधिकार्यांनी केला.
निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रूपये देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच शेतकर्यांना कर्जमाफी करू असेही सांगितले होते. मात्र सत्ता येताच महायुती सरकारने यु-टर्न घेतला असून अर्थसंकल्पात लाडकी बहिण आणि शेतकर्यांची कर्जमाफी ह्याचा साधा उल्लेखही केला नसल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी केला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे तो मोठा पराभव ठाकरे गटाला पत्करावा लागला. त्यामुळे आगामी काळात शिवसेना संघटना बळकट करण्यासाठी महायुती सरकारला उघडे पाडण्यासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागणार असल्याचा सूर पदाधिकार्यांनी व्यक्त केला.


