जळगाव – हृदय स्वस्थ असेल तर आपण जीवनाच्या ठेक्यावर संतुलितपणे ताल धरू शकतो. म्हणजे हृदय चांगले असेल तर एकंदरीत आरोग्य चांगले असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण तब्येतीकडे दुर्लक्ष करतो आणि कालांतराने दुर्धर आजार जडतात, काही शेवटच्या श्वासापर्यंत सोबत करतात तर काहींना आटोक्यात आणण्यासाठी दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात. हृदयरोग हा त्यापैकीच एक आहे, जो जीवनशैली संबंधित आजारांत मोडतो. त्यातही अनेक प्रकार आहेत.
हृदयाशी संबंधित ऑर्टिक स्टेनॉसिस एक असा आजार आहे, त्याच्या शस्त्रक्रियेचे नाव तुम्ही आतापर्यंत कदाचित ऐकले नसेल. परंतु खान्देशात पहिल्यांदाच जळगाव येथील ऑर्किड हॉस्पिटलमध्ये एका 66 वर्षे वयाच्या रुग्णावर TAVI ही हृदयरोग शस्त्रक्रिया 12 डिसेंबर रोजी यशस्वीरीत्या पार पडली. माधवराव आनंदराव पवार असे त्या रुग्णाचे नाव आहे. जळगावमधील उद्योजक महेश माधवराव पवार यांचे ते वडील आहेत. कार्डिओलॉजिस्ट डॉ. परेश दोशी व टीमने ही अत्याधुनिक प्रकारची व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी केली. यामध्ये छाती ओपन न करता तसेच कोणत्याही प्रकारे चिरफाड न करता पायाच्या नसमधून कॅथेटर द्वारे हृदयात व्हॉल्व्ह टाकला जातो. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडण्यासाठी डॉ. परेश दोशी यांना डॉ. मेघा शाह (मुंबई), डॉ. अनुजा गद्रे, डॉ. राहुल कैचे, डॉ. प्रशांत बोरोले, डॉ. ऋतुराज (भूलतज्ज्ञ), डॉ. मयूर शिंदे (सीईओ) यांचे सहकार्य लाभले.
ऑर्टिक स्टेनॉसिस म्हणजे काय? उपचारप्रक्रिया कोणती आणि दुर्मिळ का?
ऑर्टिक स्टेनॉसिस (aortic stenosis) असे त्या आजाराचे नाव आहे, जो हृदयविकाराशी संबंधित आहे. हा अत्यंत गंभीर व जीवघेणा आजार आहे. यामध्ये बरेच रुग्ण दगावतात. हा विकार दुर्मिळ यासाठी, कारण जगातील 1 हजार व्यक्तींपैकी एका व्यक्तीला या हृदयविकाराने पछाडले जाते. या आजाराकरिता आतापर्यंत ओपन हार्ट सर्जरी (Open Heart Surgery) द्वारे हृदयाची झडप बदलली जात असे, परंतु आता TAVI सारख्या अत्याधुनिक व तितक्याच अवघड उपचारपद्धतीने शस्त्रक्रिया करून छातीची चिरफाड न करता हृदयात aortic valve टाकला जातो. ही सर्वांत अत्याधुनिक व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून संपूर्ण भारतात मोठ्या शहरांत काही ठराविक ठिकाणी मोठ्या रुग्णालयातच उपलब्ध असते, ती आता जळगावमध्ये ऑर्किड हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे. जळगाव जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण खान्देशासाठी हा कौतुकास्पद, ऐतिहासिक आणि गौरवास्पद क्षण म्हणावा लागेल, कारण नाशिकपासून नागपूरपर्यंतच्या भागात पहिल्यांदाच ही क्लिष्ट शस्त्रक्रिया पार पडली असून तीसुद्धा पूर्णपणे यशस्वी झाली आहे.
‘तावी’चा आवाका आणि या दुर्धर आजाराची नेमकी लक्षणे कोणती?
तावी म्हणजे ट्रान्सकॅथेटर ऑर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लान्टेशन. ही एक वैद्यकशास्त्रातील चिकित्सा असून हृदयातील धमनीची झडप (ऑर्टिक व्हॉल्व्ह) जी पूर्णपणे उघडत नाही, त्याला बदलून रक्तप्रवाह सुरळीत करण्याचे आणि सुधारण्याचे कार्य करते. संशोधन सांगते की छातीत दुखणे तसेच श्वास न घेता येणे अशी लक्षणे आणि ‘तावी’ ची उपचारप्रक्रिया घेणारे रुग्ण आवश्यक त्या प्रक्रियेनंतर सामान्य आयुष्य जगू लागतात. त्यासाठी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होणे आवश्यक असते. तावी शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतर केवळ काही आठवड्यांच्या आत रुग्ण आपल्या नेहमीच्या दिनचर्येकडे परतू शकतो.
या शस्त्रक्रियेमध्ये नेमके काय घडते?
‘तावी’ (ट्रान्सकॅथेटर ऑर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लान्टेशन) ही शस्त्रक्रिया तीन टप्प्यांत केली जाते. सर्वप्रथम बलून कॅथेटर ऑर्टाद्वारे सोडला जातो आणि नंतर हृदयाच्या व्हॉल्व्हपर्यंत पोहचवला जातो. त्यानंतर नवा ट्रान्सकॅथेटर व्हॉल्व्ह निकामी झालेल्या ऑर्टिक व्हॉल्व्हच्या ठिकाणी बसवला जातो. अशा पद्धतीने सदर शस्त्रक्रिया पूर्ण होते. तिला जास्तीत जास्त दीड तास वेळ लागू शकतो.
तावी ही पूर्णपणे वेदनारहित शस्त्रक्रिया असून एक अरुंद लवचिक नळी (जिला कॅथेटर म्हणतात) जी मांडीतून अथवा छातीच्या रक्तवाहिनीतून आत सोडली जाते आणि तिथून हृदयातील धमनीच्या झडपेपर्यंत पोहचवली जाते. त्यानंतर अरुंद झालेल्या झडपेच्या टोकावर बदलून बसवली जाते. ऑर्किड हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पडलेल्या तावी या शस्त्रक्रियेमुळे हृदयविकाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना आता मुंबई, पुणे किंवा परराज्यात न जाता आपल्या जळगाव शहरातच सदर शस्त्रक्रियेचा लाभ घेता येईल. दुर्मिळ शस्त्रक्रिया समजली जाणाऱ्या ‘तावी’तील या यशामुळे ऑर्किड हॉस्पिटलचे नाव देशपातळीवर गेले आहे. त्यामुळे येथील डॉक्टरांचा आत्मविश्वास दुणावला आहे.