नवी दिल्ली : जगभरात पुन्हा एकदा कोरोनानं थैमान घातलं आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा घट्ट होणार का याची चिंता भेडसावत असताना दुसरीकडे जगभरातील काही देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वजण चांगल्या लशीची वाट पाहात आहे जी प्रभावी आणि परिणामकारक असेल. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताकडून मिळणार पाठबळ आणि सहकार्य यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. ट्रेडोस एडनॉम गेब्रियेसस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि WHOचे प्रमुख यांच्यात फोनवरून चर्चा झाली. त्यावेळी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारताकडून भागीदारी दर्शवण्याबाबत देखील चर्चा कऱण्यात आली आहे. त्याच बरोबर पारंपरिक औषधांनाचा समावेश देखील यामध्ये करण्याबाबत चर्चा झाली. या महासाथीचा सामना करण्यासाठी भारतानं जागतिक पातळीवर जी भागीदारी आणि समन्वय दाखवलं त्यासाठी WHOच्या प्रमुखांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक देखील केलं आहे.
कोरोनाच नाही तर इतर साथीच्या आणि मोठ्या रोगांकडेही दुर्लक्ष करण्यात येऊ नये तसेच विकसनशील देशांमध्ये आरोग्य यंत्रणेला दिलेल्या पाठिंब्याचे महत्त्वही सांगण्यात आलं. यावेळी WHOच्या प्रमुखांनी संघटना आणि भारतीय आरोग्य प्राधिकरण यांच्यातील जवळच्या आणि नियमित भागीदारीवर जोर दिला आणि आयुष्मान भारत आणि क्षयरोग (टीबी) विरूद्ध मोहिमेसारख्या देशांतर्गत उपक्रमांचं देखील कौतुक केलं.
अशा मोहिमांमध्ये भारताकडून महत्त्वाची भूमिका बजावली जात आहे. इतकच नाही तर कोरोनाविरुद्धचा लढाईमध्ये देखील भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या चर्चेदरम्यान 13 नोव्हेंबर हा दिवस कोरोनाविरुद्धच्या लढाईत आयुर्वेद दिन साजरा केला जाणार आहे अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली आहे. पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या चर्चेनंतर WHO प्रमुख डॉ. ट्रेडोस एडनॉम गेब्रियेसस यांनी ट्वीट करून मोदींचे आभार मानले आहेत.
अजून वाचा
आज बिहारमध्ये निवडणुकीतील पराभवानंतर महागठबंधनची बैठक