मुंबई – करोनाच्या धोक्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी लिलाव करण्यात आलेला नव्हता. मात्र, पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी लिलाव होणार असून त्याबाबतची सर्व माहिती लवकरच जाहीर होणार आसल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.
यंदा मार्चमध्ये होणारी स्पर्धा करोनामुळे लांबणीवर पडली. त्यानंतर अमिरातीने दिलेला प्रस्ताव स्वीकारत ही स्पर्धा यंदा आखातात घेण्यात आली. मात्र, पुढील वर्षीची स्पर्धा भारतातच होणार असून त्यासाठी सर्व संघांना सूचित करण्यात आले असून लिलाव प्रक्रियेबाबतही सर्व माहिती दिली जाणार आहे.
यंदाची स्पर्धा मंगळवारी संपुष्टात आल्यावर लगेचच बीसीसीआयने पुढील स्पर्धेसाठी तयारी सुरू केल्याचेच यातून स्पष्ट होत आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी एप्रिल व मे या दोन महिन्यांत होणार असून त्यापूर्वी सर्व संघांकडून रिलीज होणार असलेल्या खेळाडूंची यादी मागवण्यात येणार आहे. त्यांनतरच लिलावात कोणते खेळाडू उपलब्ध होतील ते स्पष्ट होणार आहे.
अहमदाबादचा संघ दिसणार
पुढील वर्षी संघांची संख्या वाढण्याचे संकेतही मिळाले असून सध्यातरी अहमदाबादचा संघ स्पर्धेत दिसेल असे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर आणखी काही संघांचाही सहभाग होण्याची शक्यता असून त्याबबातही सर्व माहिती येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.