जळगाव – जैन धर्माच्या चार्तुमासाच्या नियोजनासंबंधित महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. दरवर्षीप्रमाणे दि. २० जुलै पासून जैन धर्माच्या चार्तुमासाचे आयोजन स्वाध्याय भवन, गणपतीनगर येथे करण्यात आले आहे. या चार्तुमासाच्या काळात विविध धार्मिक अनुष्ठांन, धर्माराधना, परिषुण पर्व, प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध संदेशपर सजीव देखावे, दररोज मंगल प्रवचनाचे तसेच संत-महात्मांच्या जयंती व दीक्षांत दिन मोठ्या उत्साहात साजरा केले जाईल. चार्तुमासात परमपूज्य आचार्य भगवंत १००८ श्री रामलालजी म. सा. यांचे आज्ञानुवर्ती शासन दीपक श्री सुमितमुनिजी म. सा., श्री भूतिप्रज्ञजी म. सा., श्रीऋजुप्रज्ञजी म.सा. आदी ठाणा-३ यांच्याकडून ‘जैन दर्शन’ घडणार आहे.
जैन धर्मामधील अत्यंत प्रज्ञावान संतमुनी म्हणून पूज्य सुमितमुनिजी म. सा. सह संतमुनी ओळखले जातात. त्यांचा मोठा शिष्यगण आहे. जैन मुनी आत्मोन्नती बरोबर लोकांना धर्मानुरुप आचारणासाठी प्रेरणा देत असतात. समस्त विश्वामध्ये ‘जैन दर्शन’ ला विशेष महत्त्व आणि ओळख आहे. सत्य, अहिंसा, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या मूलभूत सिद्धांतामध्ये समस्त मानवजातीच्या उध्दाराचे गुपित सामावले आहे. हे सर्व विस्ताराने जाणून घेण्यासाठी चार्तुमास काळ सर्वश्रेष्ठ मानला जातो. जन्मोजन्मींचा फेरांचे समापन करावयाचे असल्यास व मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर करावयाचा असल्यास धर्म सिद्धांताच्या वाटेने जावेच लागेल. चार्तुमास काळात बाहेर गावाहून येणाऱ्या सुश्रावकांची ये-जा चालू असते. या संतांचा मागील चार्तुमास रतलाम, मध्यप्रदेश येथे होता.