जळगाव – ‘केळी गुणवत्ता आणि उत्पादनात भारत देश अग्रस्थानी आहे. जागतिकस्तरावर भारताचा निर्यात वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. प्रमुख निर्यातदार देशांमध्ये आपण १८ व्या क्रमांकावर आहोत. आपल्यापेक्षा लहान देश निर्यातीत पुढे आहेत. गत वर्षाची भारताची केळी निर्यात २९०.९ मिलीयन डॉलर्स होती. केळीची निर्यात एक बिलीयनच्यावर कशी होईल, याबाबतची महत्त्वपूर्ण चर्चा जैन हिल्स येथे झालेल्या अपेडा केळी उत्पादक व निर्यातदार यांच्यासमवेत बैठकीत झाली. यासाठी पायाभूत सुविधांसह फ्रुटकेअर मॅनेजमेंटसाठी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, पॅक हाऊस, कोल्डस्टोअरेज, शेतातून पॅकहाऊस पर्यंत सुरक्षीत, जलद व कमी किंमतीत वाहतूक सुविधा निर्माण करण्याविषयी सुद्धा चर्चा झाली.
जळगाव जिल्हा हा प्रमुख केळी उत्पादकांपैकी एक असून या परिसरात बडवाणी, बऱ्हाणपूर, नंदुरबार, धुळे, सुरत, नर्मदानगर आदी जिल्ह्यातील केळी उत्पादकांवर आधारित अर्थव्यवस्था मोठी आहे. यातून ग्रामीण भागात मोठा रोजगार निर्माण होतो; त्यादृष्टीने देशातील प्रमुख बनाना क्लस्टर पैकी जळगाव जिल्ह्यातही बनाना क्लस्टर असावे, यासाठी विशेष अहवाल तयार करुन स्वत: केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू’ असे आश्वासन अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी दिले.
अॅग्रीकल्चर प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अॅथोरिटी (अपेडा) व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. तर्फे कस्तुरबा सभागृह येथे आयोजित ‘बनाना ग्रोवर्स अॅण्ड एक्सपोटर्स मीट २०२४-२५’ मध्ये प्रमुुख अतिथी म्हणून अभिषेक देव बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अपेडाचे व्यवस्थापक विनिता सुधांशू, महाराष्ट्र अपेडाचे प्रशांत वाघमारे, केळी उत्पादक संघाचे वसंत महाजन, अमोल जावळे, केळी निर्यातदारांपैकी आशिष अग्रवाल, किरण ढोके, केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत आरंभी दीपप्रज्वलन झाले. केळी उत्पादक असोसिएशनच्यावतीने डि.के. महाजन, वसंतराव महाजन, सचिन पाटील, ललित पाटील, संजीव देशमुख, संतोष लाचेरा, प्रेमानंद महाजन, दिगेंद्रसिंग भरुच यांच्याहस्ते अभिषेक देव यांचा सत्कार करण्यात आला. केळीचे झाड असलेली ट्रॉफी, शाल, सूतीहार असे सम्मानाचे स्वरुप होते.