जळगाव – महाराष्ट्र दुकाने व संस्था अधिनियम, २०१७ अन्वये दुकाने, संस्था मालक व चालकांनी नोंदणी दाखला घेणे आवश्यक आहे. तसेच हा नोंदणी दाखला संस्थेत ठळक ठिकाणी प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर दुकाने व संस्था यांचे इतर भाषेतील नामफलक मराठी भाषेपेक्षा मोठे नसावे. असे सहाय्यक कामगार आयुक्त चं. ना. बिरार यांनी कळविले आहे.
तसेच त्यांनी जिल्ह्यातील दुकाने व संस्था चालक / मालक यांना आवाहन केले आहे की, शॉप ॲक्ट नोंदणी दाखला बंद झालेला नाही. ज्या आस्थापनेकडे (कामगार असो किवा नसो) शून्य ते नऊ दरम्यान कामगार असतील त्यांनी ओंनलाईन सूचना पावती काढून घेणे व संस्थेत ठळक ठिकाणी प्रदर्शित करणे बंधनकारक आहे.
त्याबाबतची ऑनलाईन फी २३. ६० रुपये मात्र सेवाकर म्हणून निर्धारित केलेली आहे. तसेच १० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार कार्यरत असलेल्या दुकाने संस्था मालक/चालकांनी महाराष्ट्र दुकाने व संस्था अधिनियम, २०१७ अन्वये नोंदणी दाखला आवश्यक त्या दस्तऐवजाद्वारे ओंनलाईन काढून घेणे व संस्थेत ठळक ठिकाणी प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. त्याबाबतची फी देखील निर्धारित केलेली आहे.
याप्रमाणे सूचना पावती व नोंदणी दाखले तपासणीचे अधिकार तपासणी निरीक्षक म्हणून सुविधाकार/दुकाने निरीक्षक यांना आहेत. जिल्ह्यातील आस्थापना चालक व मालकांनी नवीन शॉप ॲक्ट कायद्याची अंमलबजावणी करावी. शॉप ॲक्ट अंमलबजावणीसाठी कार्यालयीन अधिकाऱ्यां व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली नाही. तसेच एजंट / दलाल यांचीही या कार्यालयाकडून नियुक्ती करण्यात आलेली नाही.
त्यामुळे दुकान चालकांनी एजंट किवा दलाल यांचे भूलथापाना बळी पडू नये. काही तक्रार असल्यास कार्यालयीन दूरध्वनी क्र. ०२५७/२२३९७१६ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन श्री. बिरार, सहाय्यक कामगार आयुक्त चं. ना. बिरार यांनी केले आहे.