जळगाव – सुरेशदादा जैन हे ठाकरे गटासोबत असताना भाजप त्यांच्या बॅनरवर दादांचे फोटो वापरत आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे, सुरेशदादा जैन यांचे फोटो वापरले नाही तर मत मिळतील की नाही? याची भीती भाजपला आहे. स्वतःला संकटमोचक म्हणून घेणारे आता स्वतः संकटात आहेत. म्हणून ते असे धंदे करतायेत, असा टोला शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शनिवार दि. २० रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत आणि जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी जयंत पाटील याची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
श्री. सावंत पुढे बोलतांना म्हणाले की, संकटमोचकच संकटात असल्यामुळे त्यांना नेत्यांचे फोटो वापरावे लागत आहेत. उमेदवाराचा फोटो लोकांपर्यंत पोहोचविण्यापेक्षा मोदींचा फोटो लावला जात आहे. मोदींचा चेहरा हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे आहे. बाकी त्यांच्याकडे दुसरे काही नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
कित्येक वर्षे मंत्री, पालकमंत्री ते राहिले आहेत. मनपात देखील काही वर्षे त्यांची सत्ता होती. मात्र, जळगावच्या समस्या सोडवू शकले नाही. ते काहीच करू शकत नाहीत. त्यामुळे जनता त्यांच्या सोबत नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.